Saturday, January 11, 2014

गंभीरतेने विचार करा राज साहेब !

गेल्या बरेच दिवसांपासून राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे ने हिंदी आणि हिंदीभाषी उत्तरप्रदेश-बिहारच्या लोकांचा विरोध आणि छळवाद मांडला आहे. त्यांच्या मुंबई मध्ये उपजीवेके करीता येण्यावर त्यांचा आक्षेप असून त्यांना प्रताडित केले जात आहे. याला योग्य कसे म्हटता येईल. हे देशाच्या घटनेकडून प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या शिक्षा, व्यवसाय, उपजीवेके करीता पूर्ण देशात कुठेही येण्या-जाण्याच्या अधिकाराचा हनन आहे. आम्ही मुंबईकरांच्या या दृष्टीकोणाशी सहमत आहोत की जर हे असेच येत राहिले तर आम्ही आणि आमची मुले कुठे जाणार. मुंबईत जागा मर्यादित आहे; तीनही बाजूने समुद्र आहे; इतकी लोक इथे कशी सामावतील याचा पण काही विचार केला गेला पाहिजे. इथली नागरी-व्यवस्था कोलमडत आहे.

उ.प्र. बिहार या प्रदेशांनी उन्नती केली नाही म्हणून त्या लोकांना इतक्या दूर आपले घर-दार सोडून परक्या ठिकाणी कष्ट उपसायला यावे लागत आहे. जिथे पोट-पाण्याची व्यवस्था होऊ शकते तिथेच जाऊन लोक वसतात. त्यांना वाटते की ही सोय मुंबईला होऊ शकते म्हणून ते तिथे येतात आणि त्यांची सोय होते ही. सकृत दर्शनी यात मुंबईकरांचाच हलगर्जीपणा दिसून येत आहे. कां बरे? एक शतकापूर्वी युती म्हणजे भाजप-शिवसेनेच सरकार होत आणि त्या वेळेस राज ठाकरे त्या युतीच्या शिवसेनेचे एक प्रमुख घटक होते. त्या वेळेस कोंकण (मुंबई पण कोंकणाचाच एक भाग आहे) शिवसेनेचा गढ़ होता. तिथे गरीबी; बेकारी पण भयंकर आहे, च्या लोकांना जर एखाद्य मोहिम सारखे चालवून, जसकी वीर सावरकरांनी, ज्यांना हिंदुत्ववादी असल्या कारणाने युतीचे नेते मोठ्या सन्मानाच्या दृष्टीने बघतात, दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळेस सैनिकीकरणाची मोहिम राबवून त्यांत यश पण मिळविले होते, आपल्या लोकांना व्यवसायिक शिक्षण देऊन त्यांना मुंबईत आणून कामास लावून व्यवस्थितशीर वसवले असते तर त्यांचे पण भले झाले असते आणि ज्यांना ते समस्या समजून राहिले आहेत, ज्यांच्या मुळे त्यांची भाषायी आणि प्रादेशिक अस्मिता त्यांना धोक्यात दिसून राहिली आहे, उभी राहिली नसती. ते तर आपण केले नाही आणि आता जेव्हा ते उ.प्र.-बिहारचे भैया त्या (सेवाक्षेत्राच्या) जागेला भरण्याकरीता येऊन राहिले आहेत, कां की पोकळी कुठेच राहू शकत नाही. तर, आपल्याला अडचण होत आहे आणि आपण देशतोडक-घातक कामें आपल्या व्होट बॅंक बनविण्या, राखण्यासाठी मराठी अस्मितेच्या नावावर करीत आहात. 

कदाचित्‌ राज साहेब आपण वरील कार्य संगतीच्या प्रभावामुळे करु शकला नसाल. आपली युती भाजप बरोबर होती. भाजप जेव्हा विपक्षात असते तेव्हा 370चे कलम, समान नागरिक संहिता, राममंदिर सारखे मुद्दे उचलते, आपल्या घोषणा-पत्रात ठेवते आणि जेव्हा सत्तेत येते तेव्हा सगळे विसरुन जाते आणि आड घेते एनडीएच्या घोषणा-पत्राची. की काय करणार? आमच 'ऍलायन्स" आहे  जेव्हा पूर्णपणे भाजपच सरकार येईल तेव्हा करु! मानले की आपण (म्हणजे भाजप) असहाय होता. पण आपण बांग्लादेशींची घुसखोरी तर थांबवू शकत होता. पण नाही! आपण गोहत्या बंदी तर करु शकता होता. परंतु, ते ही आपण केले नाही. निष्क्रीय राहिलात. आणि आता गो-यात्रा काढ़ल्या जाऊन राहिल्या आहेत. याचाच अर्थ की तडजोड केवळ आणि केवळ सत्ते करीताच होती. 
आता संघ पण उ.प्र. बिहारच्या लोकांच्या रक्षकाची भूमीका घेऊन पुढ़े आला आहे आणि त्यानी आपल्या स्वयंसेवकांना त्यांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली आहेे. तथा भाजपचे अध्यक्ष श्री नीतिन गडकरींनी सुद्धा आम्ही संघाशी सहमत आहोत असे म्हटले आहे. संघपरिवाराची ही भूमीका एकात्मतेच्या दृष्टीने निश्चितच वाखाखण्या सारखी आहे आणि या प्रकारे त्यांनी आपला हिंदू व्होट बॅंक राखून घेतला आहे. पण शिवसेनेची 'आमची मुंबई"ची भूमीका, मराठी प्रेम आणि स्वतःला मराठी भाषिकांच्या रक्षणकर्त्याच्या भूमीकेत उपस्थित करणे हे काही नवीन नाही. यापूर्वी पण ते दक्षिण भारतीयांच्या विरुद्ध अशीच मोहिम राबवून चूकले आहेत. पण त्यावेळेस मात्र संघ चुप्प राहिला. याच प्रकारे 'गुरुजी जन्म शताब्दी वर्ष"च्या दरम्यान पूर्ण वर्षभर 'संघ परिवार" एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करीत राहिला की शीखधर्म धर्म नाही; जैनधर्म धर्म नाही; बौद्धधर्म धर्म नाही. हे सगळे सम्प्रदाय आहेत. धर्म केवळ हिंदूधर्म आहे. आता हे ठरवण्याचा-सांगण्याचा अधिकार संघ परिवाराला कोणी दिला की शीखधर्म धर्म आहे की सम्प्रदाय? संघाकडून वारंवार या अशा प्रकाराची वक्तव्ये दिल्या जात राहिल्यामुळे शीखांनी म्हटले की संघ प्रमुख सुदर्शनांनी पंजाबच्या भूमीवर येऊन असे भाष्य करण्याची हिंमत करु नये, नाही तर परिणाम भोगावे लागतील. तरी पण हा आलाप चालूच राहिला. परंतु, जशा पंजाबच्या निवडणूका समोर दिसू लागल्या तसेच भाजप-अकाली गठबंधनाच्या आवश्यकतेला बघून तत्काल शताब्दी समारंभाच्या समारोपाच्या वेळेस श्री सुदर्शन यांनी मंचावरुन सूर बदलून शीखधर्माला सम्प्रदायाच्या स्थानावर धर्म म्हटले. अशा प्रकारची स्वार्थी, व्होट बॅंकेची भूमीका योग्य कशी म्हणता येईल! योग्य तर हे राहील की संघानी केवळ आणि केवळ राष्ट्रहिताच्या एकात्मते वरच स्थिर राहवे. त्यास स्वार्थ आणि व्होट बॅंकेच्या राजकारणा करीता दूषित करु नये.

आम्ही राज ठाकरे बरोबरच मुंबईकरांवरही बोट उचलले आहे. ते या करीता की जेव्हा हे उ.प्र. बिहारवाले सुरवातीला 'आमची मुंबई" मध्ये उपजीविकेच्या शोधात आले तेव्हा ते कुठे आपल्या मराठीचा विरोध करीत होते, टिंगल करीत होते. जर का तेव्हाच आपण त्यांना मराठी शिकविली असती, त्यांच्याशी मराठीतच बोलला असता तर त्यांनी पण विचार केला असता की जर आपल्याला येथे राहवयाचे असेल तर ज्या प्रकारे आपण वडा-पावास स्वीकारले; त्याप्रमाणेच मराठीस पण स्वीकारावे लागेल, आपल्याला मराठी शिकावेच लागेल. या शिवाय काही पर्याय नाही. तर, ते मराठी शिकले असते. त्यांच्या आणि तुमच्या मध्ये समरसता निर्माण झाली असती. मुंबई मध्ये जी समस्या आहे ती पुण्याला किंवा नागपूरला तर दिसत नाही. पण तुम्ही तर 'बम्बईया भाषेलाच" जन्म देऊन दिला आणि आता मराठीच्या नावाने रडत आहात. आणि आता फालतूचे चाळे तुम्हा लोकांस सूचत आहेत. जसे की टेक्सी चालविण्या करीता मराठीचे बंधन. अगदी साधी सरळ गोष्ट आहे जर का एखाद्या पंजाबी भाषिकाला बंगाल मध्ये टेक्सी चालवायची असेल तर त्याला बंगालीतच बोलाव लागेल, पंजाबीनी काम चालणार नाही. कारण बंगालचे लोक आग्रहपूर्वक बंगालीतच बोलतील. पण आज एवढ्याशा छोट्याशा गोष्टी करीता आपण कायदा बनवू इच्छिता आणि टीकेचा शिकार बनित आहात.

आणि आता तर हद्द झाली की एक उच्चस्तरीय कमेटी आपल्यास सल्ला देत आहे की 'राज्याच्या मंत्री-अधिकाऱ्यांनी राज्याच्या बाहेरून येणाऱ्या गैर-मराठी किंवा परदेशी पाहुण्यांशी पण मराठीतच बोलावे". तर्क हा दिला जात आहे की 'मराठीचा उपयोग केल्याने मराठी भाषा वाढ़ेल, त्या बरोबरच दुभाषिकांच्या रुपात कित्येक लोकांस काम पण मिळेल." हा तर्क निश्चितच चांगला आहे. पण राष्ट्र-राज्याचे हित सर्वोपरी आहेत. जर आपण परदेशी पाहुण्यांशी राष्ट्र-राज्याच्याहिता करीता इंग्रजीत बोलू शकतो, परदेशात जाऊन इंग्रजीत भाषण देऊ शकतो, त्याकरीता इंग्रजी शिकू शकतो तर हिंदी कां म्हणून शिकू शकत नाही, बोलू शकत नाही? कां की हिंदी ही संपूर्ण राष्ट्राकरीता समन्वयाची भाषा म्हणून मानावीच लागेल. या बाबतीत आपण श्रीमती सोनिया गांधीचा ज्या एक परदेशी मूळाच्या आहेत, आदर्श समोर ठेऊ शकतो. ज्यांनी या देशाची सून बनण्याकरीता या देशाची संस्कृती स्वीकारली, हिंदी शिकल्या. तसेच ज्यांना हिंदी येते ते तर निश्चितच बोलू शकतात. त्यांच्या करीता हा अट्टहास कां की त्यांनी पण दुभाषियाच्याच माध्यमाने बोलावे. हं जे ग्रामीण भागातील असल्या कारणांमुळे हिंदी चांगल्या तऱ्हेने समजू-बोलू शकत नाहीत त्यांनी जर दुभाषियांची मदत घेतली तर त्यात काहीच गैर नाही. आमच्या दृष्टीने तर वरील प्रकारचा मराठी प्रेम कुचकाम्या आणि राजकारणा शिवाय आणखिन काहीही नाही.

या प्रकारेच राज ठाकरेच्या मनसे ने पण '40 दिवसात मराठी शिका किंवा मुंबई सोडा"चा एक नवीन फरमान काढ़ला आहे. उ.प्र. बिहारची लोक परदेशी आहेत कां? जे त्यांना बाहेर काढ़ण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत, आम्ही याचा विरोध करतो आणि म्हटतो की हिंमत असेल तर बांग्लादेशी घुसखोऱ्यांना जे मुंबईत ठाण मांडून बसले आहेत त्यांना हाकलून दाखवा. वस्तुतः झाले हे पाहिजे की आपण तेथल्या आपल्या मराठी भाषिकांना सांगावे की त्यांनी केवळ मराठीतच संभाषण करावे. जर उ.प्र.च्या भैया आपल्या लंगडा किंवा दशहरी आंब्याची किंमत शंभर रुपये सांगतो तर आपण मराठीत बोलावे की मी शंभर नाही पन्नासच देईन. त्याला समजो ना समजो तो आपला व्यापार चालविण्याकरीता 'पचहत्तर" म्हणेल आपण म्हणावे की चल 'साठ" देईन. 'साठ" तर हिंदी-मराठी दोन्ही भाषेत म्हटल जात. जर उ.प्र.च्या भैयाला तिथे राहून आपली उपजीविका चालवायची असेल, दोन पैशे कमवायचे असतील तर तो झक्कत मराठी शिकेल, बोलेल. त्याकरीता मारा-कूटी करायची काय गरज आहे?

राज ठाकरेच मराठी प्रेम आणि हिंदी विरोध जेव्हा विधानसभेच्या निवडणूकीत थोड्याशा यशानंतर विधानसभेच्या शपथविधि समारंभापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या मराठी प्रेमाचे प्रदर्शन करण्याच माध्यम एक 'सभासद विशेष"च हिंदी मध्ये शपथ घेण्याचे दिसले, इंग्रजीत शपथ घेण्याचा विरोध करण्याची हिंमत मात्र त्यांना एकटविता आली नाही. पण ते हे विसरुन गेले की हिंदी देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे ही बाब सगळ्यात आधी उचलणारे लोकमान्य टिळक होते. आणि त्यांचेच शिष्य वीर सावरकरांचा तर महान मंत्रच होता 'हिंदी हिंदू हिंदुस्थान" वा त्यांनी ना केवळ हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजेची मोहिम राबविली तर भाषा-शुद्धिची मोहिम सुद्धा राबविली होती. सर्वमान्य आणि सर्वज्ञात शब्द 'महापौर"चे सृजन करणारे या शिवाय आपरेशनला 'शल्यक्रिया", फिल्मला 'चित्रपट" सारखे नव-नवे शब्द हिंदीला देणारे-रचणारे वीर सावरकरच होते. हिंदीत सगळ्यात पहिली कथा लिहणारे मराठी भाषी माधवराव सप्रे होते. ज्यांच्या नावावर भोपाळ मध्ये एक संग्रहालय आहे ज्याची स्वर्णजयंती आता काही वर्षापूर्वीच साजरी केली गेली. तसेच त्या काळातील हिंदीचे मान्यवर पत्रकार श्री ग. वा. पराडकर होते हे लक्षात घ्यायला हवे. 

जर का राज ठाकरे यांचे मराठी प्रेम खरे असेल तर त्यांनी हिंदीचा उगीचचा विरोध करणे सोडून सगळ्यात आधी मराठी-हिंदीचा शब्दकोश उचलून बघावा की त्यांच्या मराठीत किती परदेशी शब्द घुसून बसले आहेत. त्या शब्दांची घुसखोरी इतकी व्यापक आहे की ते धार्मिक कर्मकांडांमधून पण उच्चारले जात आहेत. उदा. छबीना-(फा. शबीनः)-रात्री निघणारी मूर्तिची देवाची यात्रा. या प्रमाणेच महाराष्ट्रीय लोकांत आपल्यापेक्षा मोठ्या, आदरणीय लोकांकरीता सगळ्यात जास्त वापरले जाणारे शब्द आहेत आबासाहेब, बाबासाहेब. आबा आणि बाबा हे वडिल किंवा आजोबांंकरीता अरबीत वापरले जातात. या प्रमाणेच बायको (धर्मपत्नी) हा तुर्की शब्द आहे जो सगळेचजण सर्रास आपल्या सौभाग्यवतींकरीता वापरतात. 

ज्या छत्रपतींचा उत्तराधिकार आपण चालवित आहात, जे आपले आदर्श आहेत. त्यांनी हे जाणूनच की ''संस्कृत आणि मराठीचे नाते माय-लेकीचे आहे. त्यामुळे श्री रघुनाथ पंडितांकडून लिहवून घेतलेला राज्यव्यवहारकोश स्वराज्याच्या दैनंदिन व्यवहाराशी चटकन एकरुप झाला. फार्सी व अरबी शब्द जाऊन सहज सामान्य जनतेलाही समजणारे संस्कृत प्रचुर शब्द जीवनात मिसळून गेले. पेशवा, सुरनीस, सरनौबत, मुजुमदार असे असंख्य परकीय शब्द विरघळून त्या एवजी पंतप्रधान, सचिव, सेनापती, अमात्य असे आपले शब्द रुढ़ होत गेले. भाषा-शुद्धिचे मूळ व वर्म महाराजांना अचूक उमगले होते. एकदा संज्ञा बदलल्या की संवेदनाही बदलतात. स्वत्वाचा आविष्कार आपोआपच होतो. त्याचा परिणाम मन राष्ट्रीय आणि जागृत होण्यात होत असतो. महाराजांनी महाराष्ट्राच्या संवेदना जाग्या केल्या. मातृभाषा हा राष्ट्राचा प्राण असतो. भाषा म्हणजे संजीवनीच.""

पण राज ठाकरे यांनी तर आता अतिरेकाचा कळसच गाठला आहे. त्यांचे म्हटणे आहे की 'फक्त मराठी बोलण्या, लिहण्या आणि वाचण्यानी चालणार नाही. नौकऱ्या त्यांनाच मिळाल्या पाहिजेत ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल. ही तर एका प्रकारे वेगळ्या राष्ट्रीयतेची सुरवातच म्हणावी लागेल. आता त्यांचा आक्षेप त्यांच्याच मनसेचा 40 दिवसात मराठी शिकाच्या फरमानावर पण आहे. हा या देशाच्या मातीशी द्रोह आहे. महाराष्ट्रातच जन्मलेल्या वीर सावरकरांनी तर आयुष्यभर या देशाला-राष्ट्रालाच आपले देव मानले आणि राष्ट्राकरीताच जगले. राज ठाकरे यांनी हे विसरु नये की आधी राष्ट्र मग महाराष्ट्र. 

मराठी प्रमाणेच हिंदीचा जन्म पण संस्कृत मधूनच झाला आहे. ही हिंदी शुद्ध अवस्थेत संस्कृत प्रचुर राहवी या करीता उत्तरेतील पंडितांनी पण अविरतपणे प्रयत्न केले होते. म्हणूनच तर हिंदी हिंदी राहिली. हिंदुस्तानी होऊ शकली नाही. राजर्षि पुरषोत्तमदास टण्डन यांनी म्हटले होते - ''मला संस्कृतनिष्ठ हिंदीच्या चळवळीची प्रेरणा वीर सावरकरांकडूनच प्राप्त झाली होती."" आपण पण असच काही तरी महान कार्य आपल्या माय बोली प्रिय मराठीकरीता करावे. आणि आपण करु पण शकता. म्हणूनच आमच आपल्यास असे म्हटणे आहे की 'गंभीरतेने विचार करा राज साहेब". का की आमच्या विचारा प्रमाणे हीच आपल्याकडून आपल्या आराध्य वीर शिवाजी, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकरांना खरी आदरांजली राहील. आता इतके मात्र खरे की सापेक्षतया उन्नत राज्यांवर बाहेरच्यांचा हा जो भार वाढ़त आहे त्या विषयी केंद्रशासनानी विचार करण्याची आवश्यकता आहे. 

No comments:

Post a Comment