Friday, January 2, 2015

पहिली मुस्लिम स्त्रीवादी महिला -
 रुकैया सखावत हुसैन
स्त्रीमुक्तीचे पहिले कथाविधान
shirishsapre.com
'सुलतानाज ड्रीम" ही एक काल्पनिक विज्ञानकथा आहे रुकैया सखावत हुसैनची. जी विलक्षण स्वप्नकथेच्या रुपात आहे. त्यात रुकैया ने कल्पनेची जी भरारी भरली आहे ती कोणास ही आश्चर्यात पाडणारी आहे. या कथेस वाचताना असे वाटते की रुकैया जणू कांही संपूर्ण पुरुषसमाजाशीच बदला घेत आहे. 

19व्या शतकाच्या काळात जेव्हां म.ज्योतिबा फुले सर्वथरातून शिक्षण पोचविण्यासाठी प्रयत्नशील होते, बंगालात ब्राम्होसमाजाचा जन्म झाला होता, उत्तेरत आर्यसमाजाचे आंदोलन वाढ़िस लागले होते, इंग्रजी शिक्षणाची नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. स्त्री शिक्षण आणि ते ही मुस्लिम स्त्रींच्या बाबतीत दुर्लभच होते. अशा काळात 1880 मध्यें रुकैयाचा जन्म तात्कालिक ब्रिटिश इंडिया आणि वर्तमानातील बांग्लादेशच्या रंगपूर मध्यें एक उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. रुकैयाचे वडील सनातनी रुढ़िप्रिय होते. त्यांच्या नजरेत मुलींचे शिक्षण म्हणजे कुराणपठन. भाषेच्या बाबतीत अरबी, फारसी मिश्रित उर्दू आणि इंग्रजी मध्यें व्यवहार व बंगाली भाषेकडे गुलामांची व गैरमुसलमानांची भाषा म्हणून तुच्छतेने पाहणे. परंतु, रुकैयाने आपला भाऊ इब्राहिम यांजकडून बंगाली भाषा लिहणे-वाचणे शिकून घेतले. तिचे लग्न वयाच्या 16व्या वर्षी 30वर्षाच्या विधुर खानबहादुर सैयद सखावत हुसैनशी 1896 मध्यें झाले. जे इंग्रजीत उच्चविद्याविभूषित असून बिहार मध्यें जिला मजिस्ट्रेट होते. त्यांनी पण तिला बंगाली व इंग्रजी शिकण्या व लिहिण्याकरिता प्रोत्साहन दिले. तिने कित्येक लघुकथा व उपन्यास लिहिले. पतिप्रेरणेनेच तिने कोलकता मध्यें मुस्लिम मुलींन करिता एका शाळेची सुरुवात केली. जी आता राज्यशासनाकडून संचालित केली जात आहे. तिचा मृत्यु 1932 मध्यें झाला.

रुकैया स्त्री-पुरुष समानता व मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाकरिता केलेल्या कार्याकरिता ओळखली जाते. 9डिसेंबर रुकैया दिवसच्या रुपात बांग्लादेशात साजरा केला जातो. 1926 मध्यें तिने बांग्ला महिला शिक्षा सम्मेलनात म्हटले होते ः 'महिला शिक्षा विरोधी म्हणतात की महिला अमर्यादशील होतील ... जरी ते स्वतःला मुसलमान म्हणवून घेतात तरी ते इस्लामच्या मूल शिक्षणाच्या विरुद्ध जातात जो स्त्रियांना समानता आणि शिक्षणाचा अधिकार देतो. जर शिक्षणानंतर पुरुष भटकत नाहीत तर स्त्रियांच कां?"

रुकैयाने 'सुलतानाज ड्रीम" नावाची स्वप्नकथा लिहिली. त्यांत स्त्रीवादाची कल्पना होती. ही स्वप्नकथा 1905 मध्यें मद्रासहून प्रकाशित होणाऱ्या 'इंडियन लेडिज जनरल" मध्यें प्रकाशित झाली. रुकैया कल्पना करते की एका मध्यरात्री तिला एक स्वप्न पडलेले आहे त्यांत एक स्त्री तिच्या जवळ येते. तिला ती आपली बहिण सारा समजते. ही तिला चार भिंतीतून बाहेर पाडून एक दुसऱ्याच देशात घेऊन जाते. या नव्या देशात सगळा कारभारच मुळी वेगळा आहे. या देशातल्या स्त्रिया परदा करित नाहीत. इथे सर्वत्र स्त्रियाच स्त्रिया आहेत. पुरुष कोठेच दिसत नाहीत. विचारल्यावर कळते की या देशात पुरुष बंदिश म्हणजे मर्दानखान्यात राहतात. हे पुरुष स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे व अन्य घरकाम करतात. परक्या स्त्रियां समोर ते येऊ शकत नाही. त्यांचे जग घरच्या चार भिंतीच्या पलीकडे नाही.

आतापर्यंत पुरुष जी जी क्षेत्रे सांभाळायचे ती सगळी आता स्त्रिया सांभाळतात. कोठेच कोणत्याही प्रकारचा गुन्हा, अत्याचार, शोषण, हिंसा दिसत नाही कांकी ही सारी काम पुरुषच करतात व ते बंदिस्त आहेत. त्यामुळे येथे न्यायालयांची काही आवश्यकताच नाही. दिड़्‌मूढ़ रुकैया विचारते आम्ही स्त्रियांना तर निसर्गानेच दुबळे बनविले आहे अशा अवस्थेत स्त्रियांना इतके स्वातंत्र्य कितपत योग्य आहे? इथल्या स्त्रियांना संरक्षणाची आवश्यकता भासत नाही कां? या वर तिला उत्तर मिळते की जोपर्यंत पुरुष घरात आहेत तोपर्यंत स्त्रियांना कसली भिती. हिंस्त्र आणि वेड्या लोकांना ज्याप्रकारे वेड्यांच्या दवाखान्यात डांबून ठेवतात अगदी त्याचप्रमाणे या पुरुषांना घरात कोंडून ठेवणे आवश्यक असते. रुकैया म्हणते आमच्या देशात हे शक्य नाही. यावर तिला उत्तर मिळते तुमच्या देशात पुरुष स्त्रियां बरोबर दुर्व्यवहार करतो, करु शकतो परंतु त्याला मोकळ सोडून स्त्रियांनाच घरात कोंडून ठेवण्यात येते.

रुकैया विचारते की आम्ही भारतीय स्त्रियांना करावे तरी काय? पुरुष तर खूपच शक्तिवान असतो. त्यावर ती स्त्री उद्‌गारते ः सिंह देखील माणसापेक्षा शक्तिवान असतो पण म्हणून तो सिंह माणसावर वर्चस्व स्थापित करण्याचा, त्याला गुलाम बनविण्याचा प्रयत्न करतो काय? तुम्हा भारतीय स्त्रियांना हेच कळत नाही की स्वतःचे कल्याण कशात आहे. त्याला मी तरी काय करु? तुम्ही स्वतःचे नैसर्गिक अधिकार स्वतःच गमावून बसलात. 

या विलक्षण स्वप्नकथेत सौरऊर्जेच्या कल्पनेचे रोमांचित करणारे वर्णन आहे, स्वतंत्र महिला विद्यापीठाची कल्पना देखील केली गेली आहे. कदाचित अशी कल्पना देणारी रुकैया पहिलीच स्त्री असावी. वृष्टीवर पूर्ण नियंत्रणाचे वर्णन आहे. मुलींना मोफत शिक्षण मिळते. कायदाच असा आहे की 21व्या वर्षापूर्वी कोणाही स्त्रीला लग्न करता येणार नाही. या देशात धर्म म्हणजे 'प्रेम आणि सत्य". प्रत्येकाचे हे धार्मिक कर्तव्य आहे की एकमेकाशी प्रेमाने व्यवहार करायचे. खरे तेच बोलायचे. या देशाचा सगळा कारभार एक स्त्रीच बघते व सर्व संशोधनाचे कार्य देखील इथल्या स्त्रियाच करतात.

अशाप्रकारे एकापेक्षा एक विचित्र कल्पनांनी ही स्वप्नकथा भरलेली आहे. जी स्त्री स्वतंत्रता, तिच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, तिला घरात कोंडून ठेवणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे इत्यादी, पुरुष मानसिकतेच्या विरुद्ध चीड प्रकट करित आहे असे वाटते. या कथेच्या माध्यमाने रुकैयाचा आत्मविश्वास, तिची बुद्धिमत्ता, प्रतिभाच आम्हास दिसून पडते. 

ही कथा म्हणून महत्वपूर्ण आहे कां की ज्या कल्पनांना आज आम्ही काही प्रमाणात प्रत्यक्ष बघित आहोत त्या कल्पना रुकैयाने आजच्या 100हून अधिक वर्षांपूर्वीच करुन घेतल्या होत्या. एक गोष्ट आणखिन एक उच्चकुलीन महिला असून देखील तिच्या कल्पनेची भरारी साधारण स्त्रियांच्या भावभावनांशी जोडलेली आहे. एक रुढ़ींनी ग्रासलेल्या धर्मांध मुस्लिम समाजाच्या स्त्रीविषयक दृष्टिकोणाच्या विरुद्ध उभी राहून स्त्रीमुक्तिचा उद्‌घोष करणारी ती पहली स्त्रीवादी पुरोगामी लेखिका आहे. तिच्या स्वप्नकथेचा बंगाली भाषेत अनुवाद जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळी मुस्लिम धर्मांध मंडळीनी तिला तसा फारसा त्रास दिला नाही कारण तिचा पति ब्रिटिशांचा मोठा अधिकारी मजिस्ट्रेट, माहेर जमीनदार मंडळी व शासन ब्रिटिशांचे होते. पण तिच्या या स्वप्नकथेला धर्म व राष्ट्रविरोधी जरुर ठरविले गेले.

रुकैयाच्या पूर्वी महाराष्ट्रात ताराबाई शिंदे जी एक जमीनदार कुटुंबाची असून तिला हिंदी, इंग्रजी, मराठी व संस्कृत भाषा येत असून त्या काळात ती घोड्यावर बसून स्वतःच्या शेतावर जात असे. तिने देखील स्त्री-पुरुष संबंधांवर एक 52पानी लेख 'स्त्री-पुरुष तुलना" पुरुष वर्चस्वा विरुद्ध लिहिला होता पण तिला ती चर्चा वा प्रसिद्धी लाभली नाही जी रुकैयाला मिळाली. एक वैशिष्ट्य म्हणजे  सन्‌ 1950-60 पर्यंत योरोप, अमेरिकेत देखील स्त्रीवादाची संकल्पना रुढ़ होऊ शकली नव्हती त्या आधीच ताराबाई शिंदे व रकैया सारख्या महिलांनी स्त्री मुक्तिवादी भूमिका घेतली होती. आजच्या स्त्रीवादी महिलांकरिता या स्त्रिया निश्चितच आदर्श सिद्ध होऊ शकतात. कारण स्त्री समान अधिकारवादची संकल्पना कोणत्याही विशिष्ट देश किंवा धर्माकरिता अवतरित झालेली नसून ही आत्मविश्वास संपन्न स्वतंत्रतेची इच्छा बाळगणाऱ्या संवेदशील स्त्रीचे एक सुंदर स्वप्न आहे.

No comments:

Post a Comment