Sunday, July 1, 2012

सावरकर नावाचा सूर्य

सावरकर म्हणजे प्रखर सूर्य! एक बहुआयामी व्यक्मित्त्व असलेला आजच्या युगातला राष्ट्रोद्धारक मानवतावादी महर्षि! त्यांच्या प्रखर हिंुदत्व दर्शनाने भल्या-भल्यांचे डोळे दिपले. पण म्हणूनच त्यांचे अन्य समाजोद्धारक विचार नि आचार उपेक्षितच राहिले. विशेषकरुन मुळातच भक्तीभावी स्वभावाच्या अम्हां लोकांस आचरण हे आवडत नाही. म्हणून तर सावरकरांचा समाजसुधार जो एकेकाळी गायला जायचा आज ऐकायला ही मिळत नाही.

वीर सावरकरांचा हिंदुराष्ट्र हा काही एकांगी, ठिसूळ किंवा तात्पुरत्या पायावर उभारलेला नाही. हिंदुराष्ट्राची प्रबळ आणि प्रभावी उभारणी करण्यासाठी राज्यक्रांतीप्रमाणेच समाजक्रांती केली पाहिजे. ऐका क्रांतीवाचून दुसरी क्रांती घडणेच कठीण; घडली तरी टिकणेतर सुतराम अशक्य. हिंदु संघटनेच्या आंदोलनाची तत्त्वात्मक नि कार्यात्मक योजना वीर सावरकर अंदमानातून सुटण्यापूर्वीपासूनच आंखीत होते. सन्‌ 1924 मध्यें ते बंदीतून सुटून रत्नागिरीस स्थलबद्ध झाले. त्या दिवसापासून त्यांनी त्या योजनेची तिच्या त्या दुहेरी स्वरुपांत कार्यवाही करण्यास प्रारंभिले, तेव्हापासूनच ते प्रचारावू लागले आणि त्यांच्या कार्यक्रमाचे त्यांच्या स्थलबद्धतेच्या कक्षात सामावतील असे प्रत्यक्ष प्रयोगहि त्यांनी चालविले. त्यांनी त्यांतील अंगोपांगाचे विशदीकरण करणारे अनेक स्वतंत्र ग्रंथ आणि श्रद्धानंद, केसरी, किर्लोस्कर प्रभृती नियतकालिकांमधून शतावधि स्फुट लेख ही लिहिले होते. तेच प्रयोग आम्ही आता पाहणार आहोत -  

1924 साली सशर्त सुटका झाल्यानंतर पहिली तीन वर्षे म्हणजे 1926 अखेर पर्यंत सावरकरांना अस्पृश्यता निवारण, स्वदेशी प्रचार व बलसंवर्धनासाठी व्यायामशाळांचा प्रसार या तीन गोष्टींवर मुख्यतः भर दिला. पुढ़े महाराष्ट्रभर ज्या त्यांच्या भाषाशुद्धीच्या आंदोलनाने धमाल उडाली त्या भाषाशुद्धीचे कार्यहि या काळात सुरु झालेले होते. याची उदाहरणे म्हणजे 'हवामाना"ला 'ऋतुमान", रत्नागिरीच्या 'नेटिव्ह जनरल लायब्ररी"चे रुपांतर 'नगरवाचनलया"त किंवा 'नगरग्रंथालया"त झाले. याच प्रमाणे शाळांतून 'हजर"च्या ऐवजी 'उपस्थित"चा पुकारा करणे इत्यादि. कोणत्याहि नवीन गोष्टीची आरंभीच्या काळात जशी हेटाळणी आणि टवाळी होते त्याप्रमाणे या भाषाशुद्धीबाबत घडू लागले होते. याच काळात सावरकरांनी विद्यार्थ्यांसाठी हिंदीचे वर्ग चालविले. सावरकरांना भारताची हिंदी हीच राष्ट्रभाषा अभिप्रेत होती. मात्र ती हिंदी संस्कृतनिष्ठ असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याच प्रमाणे त्यांनी लिपिशुद्धी व भाषाशुद्धी मंडळे स्थापन केली, जातीभेदोच्छेदक संस्थेला जन्माला घातले. पहिले भारतीय वायुवीर रत्नागिरीचे कॅॅप्टन दत्तात्रय लक्षमण पटवर्धन तथा 'डी. लॅकमन" यांच्या देखरेखीखाली 'रायफल क्लब"ची त्यांनी स्थापना केली. तसेच सावरकरांनी रत्नागिरीत समाजक्रांतील पूरक असे एक 'अखिल हिंदु उपहारगृह" सुरु केले. त्या उपाहारगृहाचे संचालक श्रीगजाननराव दामले होते. तेथे चहा, चिवडा महाराच्या हातचा मिळे. तेथेच सावरकरांचे पाहुणे त्यांना भेटायला येत. अस्पृश्योद्धाराबरोबरच सावरकरांचे शुद्धीकरणाचे कार्यहि सुरु होते. त्यांनी घडवून आणलेले महत्वाचे शुद्धीकरण म्हणजे खारेपाटणच्या धाक्रस कुटुंबाचे. दहा-पंधरा वर्षापूर्वी ख्रिश्चन झालेल्या या कुटुंबाला सावरकरांनी शुद्धीसमारंभ करुन परत हिंदुधर्मात घेतले. समाजात रुळविले इतकेच नव्हे तर त्यांच्या दोन उपवर मुलींची लग्ने योग्य अशा वरांशी करुन दिली. आणि एका मुलीच्या लग्नात तर श्रीधाक्रस यांच्या आग्रहावरुन कन्यादान ही केले. सावरकरांनी प्रचारिलेल्या गोष्टी आता समाजाच्या अंगवळणी पडू लागल्या होत्या. पण त्यावर संतुष्ट न राहता गतिमान असणे हा सावरकरांच्या कोणत्याहि आंदोलनाचा एक महत्वाचा भाग असे. म्हणून देवालयाच्या 'पायरीनंतर सभामंडप आंदोलन" सावरकरांनी सुरु केले. स्पृश्यास्पृश्यांचे समिश्र मेळे देवालयाच्या सभामंडपात जाण्यास काहीच हरकत नाही असा प्रचार सुरु केला. कोणत्याहि सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या बांधवांना बरोबर घेऊन ते देवळात जाऊ लागले. या आंदोलनामुळे अनेक लोक त्यांस सोडून जाऊ लागले सुधारकच काय ते राहिले. सामान्य लोकांना अस्पृश्यांचा देवालय प्रवेश हा त्याकाळी भयंकर भ्रष्टाचार वाटला यांत काहीच नवल नाही. सावरकर आपल्या कोणत्याहि नव्या आंदोलनाचा उपक्रम करीत तो सार्वजनिक गणेशोत्सवातून आणि रत्नागिरीच्या पुरातन श्रीविट्ठल मंदिरातून. गणेशोत्सव समिती हे सावरकरांचे व्यासपीठ होते. अस्पृश्यता ही धर्मशास्त्राला धरुन असल्याने तिचे पालन केले जावे असे म्हणणाऱ्यांची व्याख्याने मुद्दाम सनातन्यांनी घडवून आणावी तर अस्पृश्यता निषेधाची सुधारकांनी. अशी ही रस्सीखेच जवळ-जवळ दोन वर्षे सुरु होती. या मुळे समाज अगदी खालच्या थरापासून ढ़वळून निघत होता. अस्पृश्यते बाबत अनुकूल वा प्रतिकूल चर्चा या विना रत्नागिरीच्या वातावरणात इतर विषय नव्हता.

1928 मध्यें दसऱ्याच्या शुभदिनी, परधर्मीयांना आपण आपल्या घरात जेथ पर्यंत जावू देतो तेथ पर्यंत तरी अस्पृश्यास येऊ देण्यास तयार असलेल्या हिंदु नागरिकांच्या घरात, आपल्या सवाशे अनुयायी आणि 8-10 अस्पृश्यांस समवेत समारंभपूर्वक प्रवेश केला. आणि ती सर्व नावे प्रसिद्ध करण्यात आली. शाळातून ही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलांना सरमिसळ बसविण्यात यावे, त्यांना शाळेच्या पडवीत किंवा वर्गात एका बाजूला बसविण्यात येऊ नये. ही गोष्ट सावरकर हिंदु संघटनाच्या दृष्टीने अत्यंत भरीव आणि मूलगामी समजत. पण सावरकरांच्या या ही आंदोलनाला प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. कित्येक शाळातून शिक्षकांचे संप झाले तर कित्येक गांवातून गांवकऱ्यांचा विरोध झाला. काही ठिकाणी स्पृश्यांनी दिलेल्या जागा काढून घेतल्या तर काही ठिकाणी अस्पृश्यांनी मुलांस शाळेत पाठिविले तर बहिष्कार घालण्यात येईलच्या धमक्या देण्यात आल्या.

देवालय प्रवेशा बरोबरच सावरकरांना समाजाच्या ऱ्हासास कारणीभूत झालेल्या 'बंद्या" तोडून टाकावयाच्या होत्या व म्हणून जुन्या देवालयां मध्यें अस्पृश्यांच्या प्रवेशाच्या चळवळी बरोबरच ज्या देवालयात अस्पृश्यांना सवर्ण हिंदुं प्रमाणे प्रवेश नि इतर अधिकार असतील असे 'अखिल हिंदुंसाठी श्रीपतितपावन मंदिर" श्रीभागोजी कीर शेटजींच्या साहय्याने उभारले. 1929च्या दहा मार्चला या मंदिराची कोनशिला बसविण्याचा समारंभ श्रीमत्‌ शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित असलेल्या स्पृश्यास्पृश्यांच्या प्रचंड जनसमुदाया समोर सावरकरांनी या देवालयाच्या उद्देशाची रुपरेषा खालील प्रमाणे कथन केली -

1). या देवालयात शंख, चक्र, पद्म, गदाधारी भगवान श्रीविष्णुंची लक्ष्मीसह स्थापना करण्यात येईल. 2). त्या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार जातीनिर्विशेषपणे सर्व हिंदुंना समान असेल. 3). मात्र अशी पूजा करणाऱ्याने प्रथम देवालयाच्या आवारात स्नान करुन व शुद्ध वस्त्रे धारण करुन नंतर पूजेसाठी गाभाऱ्यात जावे. 4). देवालयाचा पुजारी 'स्वधर्मक्षम" असला पाहिजे, मग तो कोणत्याहि जातीचा असो. अशा प्रकारे सर्वहिंदुंना खुले असणारे देवालय अखिल महाराष्ट्रातच काय पण अखिल भारतातहि दुर्मिळ असल्यामुळे या मंदिराला एक वैशिष्ट्य प्राप्त झाले. या प्रसंगी सावरकरांनी भाषणात म्हटले ''अस्पृश्यांना प्रेमाने शिवून अंगीकारणारे दोन शंकराचार्य झाले. पहिले पीठ स्थापक आद्य शंकराचार्य काशीला स्नान करुन येत असता मार्गात अद्वैत तत्त्वज्ञानी अशा एका अस्पृश्याला आलिंगणारे आणि दुसरे हे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी अखिल हिंदुंचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या पांडु विठु महारास हार आणि हात आपल्या गळ्यात घालू देऊन त्या पांडोबा बरोबरच स्वतःहि कृतार्थ झाले. हे श्रीपतितपावन मंदिर आठवण आहे सनातन्यांच्या विरोधाला दाद न देता अस्पृश्यतेच कलंक धुवून काढ़ण्याच्या सावरकरांच्या क्रांतीकारी कार्याची.

श्रीपतितपावन मंदिरा मुळे सावरकरांना निर्वेधपणे समाजक्रांतीचे कार्य करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त झाले. जेव्हा सनातन्यांनी अस्पृश्यांना गणेशोत्सवाकरिता विट्ठल मंदिराच्या सभामंडपात प्रवेश देण्याचे नाकारले तेव्हा सावरकरांनी सभासदत्वाचे त्यागपत्र देऊन अखिल हिंदुंना गणेशोत्सवात भाग घेता येईल असा अखिल गणेशोत्सव श्रीपतितपावन मंदिरात सुरु केला. याच उत्सवात दीड हजार स्त्रियांनी भाग घेतलेले अखिल हिंदु हळदीकुंकुहि झाले. विशेष नमूद करण्या सारखे म्हणजे पाच अस्पृश्य मुलांनी गायत्रीपठणाच्या  स्पर्धेत भाग घेतला. शिवू भंग्याने शास्त्रशुद्ध स्वरां मध्यें शेकडो लोकांसमोर तीनदा गायत्रीमंत्र म्हणून बक्षीस पटकाविले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सावरकरांची 'हिंदुतील जातीभेद" या विषयावर झालेली व्याख्याने, ही होय. हिंदुजातीच्या सध्याच्या दुबळेपणाला, विस्कळीतपणाला 'हिंदुतील जातीभेद" महत्वाचे कारण आहे. हिंदुंच्या सामर्थ्याला खच्ची करुन टाकणाऱ्या बहुतेक सर्व दुष्ट रुढ़ींचे मूळ या जन्मजात जातीभेदात आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. आणि म्हणूनच जातीभेदाच्या उच्छेदनाचे आंदोलन हाती घेण्याचे त्यांनी ठरविले.
त्यांनी 'केसरी"मधून 'जातीभेदाचे इष्टनिष्टत्व" या मथळ्याखाली लेखमाला लिहिली व या प्रश्नाला महाराष्ट्रात चालना दिली. प्रचलित जातीभेदाचा अनिष्टपणा मुख्यतः तरुणांच्या मनावर बिंबला पाहिजे म्हणून रत्नागिरीतील तरुणांचे 'हिंदु मंडळ" स्थापन करुन त्यात जातीभेदाचे अनिष्टत्व सिद्ध करण्यासाठी चर्चा करित असत. त्यांचे म्हटणे होते जातीभेद हा सप्तपाद प्राणी आहे. ते पाय म्हणजे वेदोक्तबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी. यातील विशेषतः तीन पाय स्पर्शबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी तोडले की जातीभेद खाली कोसळलाच म्हणून समजा. याकरिता 'जातीभेदोच्छेनार्थ अखिल हिंदु सहभोजन करिष्ये" असा संकल्प सोडून सहभोजने झाली पाहिजेत. 16 सप्टेंबर 1930 रोजी हे पहिले सहभोजन रत्नागिरीला झाले. या समारंभामुळे रत्नागिरीतच नाही तर महाराष्ट्रभर खळबळ उडाली. आता जातीभेदउच्छेदनाचा संकल्प सोडून सहभोजने म्हणजे आगीत तेल ओतणे होते. आधीच त्यांना रुढ़ीप्रिय समाज 'पाखंडी", 'सबगोलंकारी" म्हणत होता. पूर्वीच काही अनुयायी देवालय प्रकरणामुळे सोडून गेले होते. त्यात आणखिन भर पडली. तथापि, 'वरंजनहितं ध्येयं केवला न जनस्तुती" या ध्येयाने प्रेरित झालेल्या सावरकरांनी फिकीर केली नाही.

जात्युच्छेदक सहभोजनांचा व सहभोजकांवरील सनातन मंडळीच्या बहिष्काराचा धुमाकूळ सुरु झाला असताना श्रीपतितपावन मंदिराच्या उद्‌घाटनाच्या वेळेस भागोजी कीर शेटजी जातीने भंडारी असल्यामुळे वेदोक्त पद्धतीने आम्ही धार्मिक विधि करणार नाही, असे शास्त्रीपंडितांनी सांगितले. तेव्हा सावरकर एका बाजूला आणि शास्त्रीपंडित दुसऱ्या बाजूला या पद्धतीने दोन दिवस शास्त्रार्थ चालला होता. सावरकरांचे धर्मग्रंथांचे वाचन किती दांडगे आहे हे त्यावेळी सर्वांच्या प्रत्ययास आले. शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी कीरशेटजींच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधि व्हावयास हरकत नाही असा निर्णय दिला. तरीहि शास्त्रीपंडितांना ते मान्य झाले नाही. भाविक वृत्तीचे शेटजी म्हणाले पुराणोक्त तर पुराणोक्त पण देवप्रतिष्ठा वेळेवर होऊ द्या. सावरकर तत्काल म्हणाले प्रत्येक हिंदुला वेदोक्ताचा अधिकार आहे. या तत्त्वाला सोडणार असाल तर मला ही सोडा, पण जर तत्त्वास सोडणार नसाल तर पूर्वास्पृश्यांचा जो हजारोंचा समुदाय आज आलेला आहे त्या हजारो हिंदुंच्या हस्ते देवमूर्ती उचलून 'जय देवा" असा घोष करुन आम्ही ती मूर्ती स्थापणार. हाच आमचा विधि. 'हिंदुधर्म की जय"चे हजारो कंठातून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि 'भावेहि विद्यते देवो" हाच आमचा शास्त्राधार.

शेवटी मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वे.शा.सं. विष्णुशास्त्री मोडक यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार कीरशेटजींच्या हस्ते वेदोक्त विधिने देवप्रतिष्ठादिक सारे धर्मविधि यथासांग पार पाडले आणि दिनांक 22 फेब्रुवारीला श्रीपतितपावनाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्रीशंकराचार्यांच्या हस्ते 'हिंदुधर्म की जय"च्या गगनभेदी आरोळीत करण्यात आली. या समारंभात पुण्याचे श्रीराजभोग यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा केली. दुसऱ्या दिवशी 23रोजी अन्नसंतर्पणाच्या कार्यक्रमात 'सावरकरांचे पाखंडी सहभोजन होता कामा नये" असा आग्रह अनेक सनातनीयांबरोबरच श्रीमसूरकर महाराज, संत पाचलेगांवकर महाराज व स्वतः डॉ. कूर्तकोटी यांनी कीरशेटजीकडे   धरला. सहभोजन, जातीउच्छेदन ही आंदोलने आततायीपणाची व पाखंडी आहेत. सावरकरांच्या या आंदोलनाला आमची मुळीच संमती नाही असे ते जाहीरपणे सांगू लागले.
पण या अन्नसंतर्पणातील जात्युच्छेदक सहभोजनाचा कार्यक्रम सावरकर रद्द करणे शक्यच नव्हते. या समारंभातील दूरदूरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना रत्नागिरीतील समाजक्रांतीचे प्रात्यक्षिक दाखविण्याची संधी गमविणे सावरकरां सारख्या आग्रही प्रचारकाला मानविणारे नव्हते. त्यांनी कीरशेटजींकडे न्याय्य मागणी केली, ''अन्नसंतर्पणाचा सहभोजन करु इच्छिणाऱ्यांची एक स्वतंत्र पंगत ठेवण्याची व्यवस्था करा, ज्याला त्या पंगतीत बसावयाचे असेल तो बसेल. सनातन्यांच्या जातवार पंक्तीला आम्ही सहभोजक विरोध करणार नाही. त्यांनी आमच्या पंक्तीला विरोध करु नये. त्यांचा प्रामाणिकपणा आम्ही मानावा आमचा त्यांनी."" सावरकरांच्या जातीभेदोच्छेदक सहभोजनाचे लोण आमच्या इंदुरातहि चटनी-रोटी सहभोजनाच्या रुपात पोहोचले होते. 

22 फेब्रुवारीलाच मंदिराच्या सभामंडपात दुपारी मुंबईचे अस्पृश्यता निवारक परिषदेचे सहावे अधिवेशन भरले. अध्यक्ष म्हणून सावरकरांची निवड करण्यात आली. सुभेदार घाटगे (पुणे) यांनी तर 'आमचे हे खरे शंकराचार्य" अशी पदवी सावरकरांना दिली. स्त्रियां पुरुषांपेक्षा अधिक कर्मठ, रुढ़ीग्रस्त असतात. त्यामुळे जात्युच्छेदनाचे आंदोलन स्त्रियांत रुजले तरच ते जास्त शाश्वत स्वरुपाचे होण्याचा संभव होतो. त्यासाठी त्यांच्यातहि उघडपणे रोटीबंदी तोडण्याची प्रवृत्ती सुरु करणे आवश्यक होते. पण ते काम साधे नव्हते. त्यासाठी खूप मेहनत पडली. वर्ष-दीडवर्षाच्या प्रयत्नांनंतर तीस-पस्तीस सुविद्य स्त्रियां आणि वीस-पंचवीस अस्पृश्य स्त्रियां यांचे पहिले सहभोजन 21सप्टेंबरला पार पडले. याच मंदिरात सावरकर अस्पृश्यांना जानवी सुद्धा वाटत असत. 
1933 सालच्या शिवरात्रीला रत्नागिरीतील जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युदिन पाळण्याचे रत्नागिरी हिंदूसभेने ठरविले. त्यां 'दिना" साठी पुण्याच्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे कर्मवीर शिंदे आणि दलित वर्गाचे पुढ़ारी पा.ना.राजभोग आले होते. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर शिंदे ज्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात आपले सगळे जीवन व्यतीत केले होते. महर्षि शिंदे म्हणाले ''रत्नागिरीतील सामाजिक परिवर्तनाची मी बारिक रीतीने पाहणी केली ती वरुन मी निःशंकपणे असे सांगतो की, येथे घडत असलेली सामाजिक क्रांती खरोखरच अपूर्व आहे, सामाजिक सुधारणेचे काम जन्मभर करीत आलो आहे. ते इतके कठीण आणि किचकट आहे की, मी देखील मधून-मधून निरुत्साही होतो. पण असे हे किचकट काम अवघ्या सात वर्षात रत्नागिरीसारख्या सनातनी नगरात सावरकरांनी करुन दाखविले. ही रत्नागिरी केवळ अस्पृश्यतेचेच उच्चाटन करुन थांबली नाही तर ती जन्मजात जातीभेदांचेच उच्चाटन करण्यास बद्ध-परिकर झाली. तुम्ही अस्पृश्यांबरोबर सहभोजन, सहपूजन इत्यादि सारे सामाजिक व्यवहार प्रकटपणे करीत असताना मी पाहिले आहे. याचा मला इतका आनंद होत आहे की, हे दिवस पाहायला मी जगलो हे बरे झाले असे मला वाटते.""

सावरकरांची ही समाजक्रांती पुढ़े खंडित झाली परिणामी 1927 मध्यें महाडला डॉ. आंबेडकरांची केलेली घोषणा 1956च्या दसऱ्याला कार्यवाहीत आणली. 24मे 1956 बुद्धजयंतीला मुंबईच्या नरे पार्कवर डॉ. आंबेडकरांनी निर्वाणीची घोषणा केली की येत्यां 14ऑक्टोंबर 1956विजयादशमीला अनुयायांसमवेत मी बौद्धधर्म ग्रहण करणार. डॉ. आंबेडकरांना या विचारापासून परावृत्त करणारी एकहि हिंदुशक्ती नव्हती असेच म्हणावे लागेल. सरसंघचालक श्रीगोलवलकर गुरुजींनी दत्तोपंत ठेंगडींना डॉ. आंबेडकरांकडे पाठविले. ठेगंडींच्या माध्यमें आलेल्या संघाच्या विनंतीवर डॉ. आंबेडकर म्हणालेत संघस्थापनेच्यानंतरच्या तीस वर्षात तुम्हीं केवळ 27-28लाख सवर्ण, दलितांना संघात आणू शकलात तर साऱ्या दलितवर्गाला तुमच्या संघात आणायला किती वर्षे लागतील? ठेंगडी मौन झाले नि प्रत्यक्ष नागपूरातच दसऱ्याच्या विजयदिनी तथाकथित अस्पृश्यांचा मोठा भाग हिंदुधर्मसमाजातून वेगळा झाला.

No comments:

Post a Comment