Friday, January 23, 2015

गांधीयुगाचा आदर्श सेवामयी जीवनव्रती - अप्पा पटवर्धन ऊर्फ कोंकणचा गांधी

आजकाल स्वच्छते व शौचकूपांचा उल्लेख मोठ्या धामधूमीने केला जात आहे. अशा वेळेस महान कर्मयोगी अप्पा पटवर्धन (सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन) जे गांधीजींच्या असहकार युगाच्या आधीच त्यांच्या सत्याग्रह आश्रमात दाखल झाले होते. ज्यांची मूळभूत जीवन प्रेरणा होती - मातृभक्ति, ब्रह्मचर्य, दलित सेवा. त्यांच्या गोपुरीच्या प्रयोगला भरपूर प्रसिद्धि लाभली होती. गोपुरीच्या  प्रयोगांतूनच ते विनोबाजींच्या भूदान चळवळीकडे वळले. त्यांचे आत्म-चरित्र स्वच्छतेच्या विषयाशीच निगडित आहे, अत्यंत समयानुकूल असल्यामुळे त्यांस संक्षेपात प्रस्तुत करित आहे. त्यांच्या 'जीवन-यात्रा"चे महत्व यावरुन समझले जाऊ शकते की अप्पा पटवर्धन त्या 8-10 लोकांपैकी एक होते ज्यांनी गांधीकार्य उत्तम रीतीने समजून घेऊन त्याला आपले आयुष्य अर्पण करण्याचे ठरविले. त्यांच्या विषयी विनोबा नेहमी म्हणत - 'एक अप्पा, बाकी गप्पा."

त्यांनी लिहिलेल्या या त्यांच्या आत्मचरित्रात अत्यंत उच्चप्रतीचा प्रांजळपणा सर्वत्र आढ़ळतो. ह्याची साक्ष ह्या ओळी आहेत ः 'जी गोष्ट उचित व आवश्यक म्हणून बुद्धिला पटली ती लोकांच्या निंदा-स्तुतीची पर्वा न करता तत्काळ अंमलात आणायची हे गांधींनी एक दिवसात केलें आणि तेंच करायला मला कित्येक वर्षे लागली आणि शेवटी करु लागलो तेहि गांधींजींच्या आश्रमाच्या आश्रयाने. नंतर जी कर्तव्य-विस्मृति आली होती ती रस्किनच्या वाचनापासून दूर झाली, सुस्ती जाऊन जागृति सुरु झाली." जॉन रस्किनचे 'अंटु धिस लास्ट" भारतात 'सर्वोदयच्या" नावाने प्रसृत झाले. या पुस्तकाला गांधींनी रेल्वेच्या प्रवासात वाचले होते आणि त्याचा परिणाम ते बॅरिस्टर गांधींचे किसान गांधी झाले. आणि नंतर क्रमाक्रमाने चांभार, हरिजन व विणकर बनले.

संडास या शब्दाशी त्यांची पहली ओळख रत्नागिरीस त्या वेळेस झाली जेव्हां ते येथे मिडलस्कूल स्कॉलर्शिप परिक्षेसाठी आले होते. त्यांच्या शब्दांत - 'तो प्रसंग मी जन्मभर विसरणार नाही. संडासाची घाण इतकी असह्य झाली की तेवढ़े एक मिनिट भर श्वांस कोंडून धरणे अवघड झाले. मी पुढ़े कित्येक वर्षे पुन्हा संडासात गेलोच नाही. दूर उघड्यावरच शौचाला जात असे. पावसाळ्यात भातशेतीच्या बांधोळ्यावरच बसावे लागे त्याची खंत वाटे." (आजही हीच परिस्थिती कित्येक स्थानांवर सहजच दिसून पडते)

शौचकूपांसंबंधी जागृती यावी या करिता मी सगळ्यात आधी डिसेंबर 2012 मध्यें पहिला लेख लिहिला होता. त्यांत मी लिहिले होते- 'तुम्हांस आश्चर्य वाटेल की 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आमच्या नेत्यांना शौचकूप पण एक समस्या आहे याचे भान सुद्धा नव्हते. ही एक समस्या आहे याकडे सगळ्यात आधी कोणी लक्ष वेधिले असेल ते गांधीजींनी. गांधीजी कांग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात सगळ्यात आधी शौचालयांच्या व्यवस्थेकडेच लक्ष देत असत की तेथे पाणी इत्यादिची योग्य व्यवस्था आहे की नाहीं."

हे वाक्य किती अचूक आहे हे अप्पांच्या 'जीवन यात्रा" या आत्मचरित्रातल्या या ओळींवरुन देखील कळते ः खादी संघाच्या सभेकरिता ते नगरला आले होते. 'लघवीला कोठे जावें?" विचारता घराच्या वरील गच्चीवर जाण्याची सूचना मिळाली. गच्चीचा शौचासाठीही उपयोग केला जातो असें समजलें ! रत्नागिरी व मुंबई-पुण्याबाहेरील महाराष्ट्राचा हा मला पहिलाच परिचय होता."

सार्वजनिक स्वच्छतेचे कार्य त्यांच्याकडून अकस्मात्‌ एप्रिल 1928 मध्यें सुरु झाले. कोंकण बालावलीच्यानारायण मंदिरात रामनवमी उत्सवांप्रीत्यर्थ अनेक लोक एकत्रित होत असत. तेथे ते चरख्याच्या प्रचारार्थ गेले असतां रात्रीच्यावेळेस धर्मशाळेच्या जवळच्या तलावात पाणी पिण्याकरिता गेले. मंदिराच्या आसपास सगळीकडे लघवीची घाण येत होती. ती तुडवत तलावावर जावून त्यांनी पाहिल की तलावाच्या पायऱ्या-पायऱ्यांवरुनहि लघवीचे ओघळ जात होते. (लघवीच्या ओघळांचे अशाच प्रकाराचे दृश्य बस स्थानकांवरच तर काय कित्येक स्थानी देखील पाहावयास मिळतात.) सकाळी शौचाला जाताना त्यांना आढ़ळले की त्याच तलावाच्या दूरच्या टोकाशी यात्रेकरु शौचाची सफाईहि बिना तांब्यानेच करित होते.

'आता काय करावे? येथे चार दिवस काढ़ायचे कसे? निघून जावे तर तो पलायनवाद होतो." ते उत्सवाच्या चालकांना जावून भेटले. आणि त्यांच्या समोर उत्सवाच्या मुदतीत देवळाच्या आसमंतातील सफाई योजना - खड्‌डयाच्या मुत्र्या व कचऱ्यासाठी करंड मांडण्याची, मांडली. त्यांनी सहकार्य देण्याचे मान्य केले व अशा प्रकारे सफाई कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिणामी उत्सवाच्या मुदतीत चांगलीच स्वच्छता राहिली. सर्वांचे सर्वप्रकारें साह्य मिळाले. स्थानीय साप्ताहिकाने सफाई कार्याची तारीफ केली.

त्यांच्या या कामगिरीची दखल सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटीचे अधिकारी एन.एम.जोशीनी घेतली. ते अप्पांना म्हणाले - 'तुमचा गांधीवाद आम्हाला पटत नसला तरी तुमची ग्राम सेवा मोलाची आहे. आमच्या सोशल सर्विस लीगपाशी फ्लारेंसनाइटिंगेल व्हिलेज सेनिटेशन फंड आहे त्यांतून खेड्यात कांही आरोग्य संवर्धक कार्य करशील तर आपण मदत मंजूर करु." त्यांनी चराच्या संडासाची प्रचाराची कल्पना मांडली. तिच्यासाठी त्यांनी 150 रु. मंजूर करुन मला पाठवूनहि दिले." अप्पांनी मोडत्या-जोडत्या व फिरत्या चौकटी संडासाच्या आडोशासाठी आणि झाप, तट्टे, किंतान व चर खणून एक स्वस्त, स्वच्छ, सभ्य, सुटसुटीत, स्वाधीनचा, समृद्धिदाता आदि गुणांचे वर्णन करुन त्यांस शेतकऱ्यांचा शौचकूप अशा नावाचे संडास उभारले. सावंतवाडी म्युनिसिपालटीने देखील या संडासांना मंजूरी दिली. या संडासांची सर्वत्र वाहवा झाली. 

1928 पासून त्यांनी संडास-मुत्री-सफाई बाबत अनेक उपक्रम, प्रचार, प्रयोग व सत्याग्रह केले होते. 1946 मध्यें ते हरिजन मुक्ति कार्याकडे वळले. याचा पहला प्रयोग कणकवली गांवात केला. याच कारण कणकवली गांवाची सार्वजनिक सफाई बाबतची स्थिति एकंदरित किळसवाणीच होती. कणकवलीच्या तिठ्‌यावरच मोटारी थांबत असत व तेथेच बाजार, हॉटेले, पोस्ट ऑफिस, प्राथमिक शाळा इत्यादि होत्या. लोक तेथेच लघवी करीत व नजीकच्या झाडीत शौच्याला जाण्याची वहिवाट, नवीन मुंबई-गोवा रस्ता झाल्यानंतरहि, चालूच होती. यामुळे पावसाळ्यात चिखल व लघवीची दुर्गंधी इतकी येत की तेथे उभे राहणे मुश्किलीचें होत. अप्पा म्हणतात, 'मला स्वतःला लघवीला फार वेळा जावें लागते, त्यामुळे छोट्या शहरामध्यें व देशावरील गांवामध्येंहि जेथे सार्वजनिक मुत्र्या नसतात तेथे, लघवीची मला स्वतःला अडचण जाणवत असते. (आज देखील हिच परिस्थिती कित्येक जागी अजून दिसून पडते) याबद्दल कणकवलीचा रहिवाशी या नात्याने मला मोठी शरम वाटत असे.

देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणार व आता आपल्याला तुरुंगात जाण्याचे प्रसंग येणारच नाही. स्वतंत्र भारत हा स्वच्छ भारत असलाच पाहिजे त्या दृष्टिने काही प्रयत्न सुरु करावा असा विचार करुन 'स्वच्छ कणकवली" कार्यक्रम हाती घेतला. '1946च्या मे मध्ये कणकवलीमध्ये मी जागोजाग सार्वजनिक संडास आणि विशेष ठिकाणी व शाळांमध्ये मुत्र्या सुरु करण्याचें, रस्ते झाडणे व ठिकठिकाणचे उकिरडे साफ करणे इत्यादि कार्यक्रम हाती घेतले. गांधीजींच्या आश्रमाच्या पद्धतीचे दोन दोन बालद्यांचे संडास मांडले. बालद्यांऐवजी मातीच्या मोठमोठ्या कुंड्‌या स्थानिक कुंभाराकडून करवून घेतल्या व त्यांना डांबर काढ़ले. सरपंचाच्या सल्ल्याने मोटर स्टंडवर व आणखी तीन-चार ठिकाणी चार-चार संडास सुरु केले. कुंड्यात सागवानाचीं पानें आंथरीत व मळ्यावर झाकण्यासाठी एका डब्यात राख ठेवीत असू. मलमूत्र वाहून घेण्यासाठी कावडी केल्या. भर पावसाळ्याचे दोन-तीन महिने हें काम मोठ्या उत्साहाने चालले. स्वतः अप्पाने लघवीने भरलेल्या कावडी वाहून नेल्या. यात मानवतेच्या खालोखाल स्वच्छतेची दृष्टी होती. आणि मलमूत्रापासून उत्कृष्ट खत बनून त्यातून धान्यवाढ़ व्हावी अशी दृष्टीहि होती.

त्यांच्या गोपुरीच्या कल्पनेला चांगलीच प्रसिद्धी लाभली होती. त्यामागे ही त्रिविध घोषणा होती - 1. हरिजन मुक्ति आंदोलन - निकराने चालवा. 2. स्वच्छ भारत आंदोलन - यशस्वी करा. 3. अन्नसमृद्धि आंदोलन - तडीस न्या. त्यांची हरिजनमुक्ति ही संडासमुत्र्यांपुरतीच मर्यादित नव्हती. मृतपशु विच्छेदन (मेलेल्या जनावरांची कातडी सोडविणे) व शवसाधना (मृतदेहांचा परिपूर्ण उपयोग करणे) ही हरिजनमुक्ति कार्यक्रमाचीं अंगेच होती. गोपुरीत गांधी निधीचे कार्यकर्ते सफाईच्या शिक्षणासाठी येत. गोपुरी संडासाची रचना शिकून घेण्यासाठी पण येत. कित्येक ग्रामपंचायतींना त्यांनी मैला गॅसप्लॅंट बांधून दिले.

अशा प्रकारे ते भारतविख्यात सफाई नेता बनले. आणि या सर्वांवर मात केली विनोबांनी. इंदूरच्या लोकांना विनोबांबद्दल वाटणारा भक्तिभाव किंवा आकर्षण अद्‌भुत होतें. इंदूरच्या प्रमुख नागरिकांनी विनोबांना भेटून 'आमच्याकडून तुम्हीं कोणकोणत्या गोष्टींची अपेक्षा करता?" असें विचारले. विनोबांनी इंदूर नगरी साफसूफ व्हावी, त्यासाठी तुम्ही अप्पांना बोलवून घ्या, असें सांगतिले. लगेच  अप्पांना उज्जैनचे खासदार श्रीपुस्तके, व श्री. दादाभाई नाईक यांनी तांतडीने इंदूरला येण्याबद्दल पत्रें धाडली.

अप्पा म्हणतात, इंदूरला जाण्यात माझा हेतु 'सफाई यज्ञा"चा उठावदार प्रचार करायला मिळावा हा होताच, पण आपली नगरदानाची कल्पना विनोबांना पटवून देता आल्यास पाहावें असाहि होता. पण या दोहोंपैकी माझा कोणताच हेतु सफल झाला नाही. तरीपण मी व विनोबा इंदूर सोडून गेल्यानंतर तेथे साप्ताहिक सफाई स्वयंसफाई कार्यक्रम काही काळ चालू राहिला. शिवाय इंदूरच्या वास्तव्यात मला सफाई कार्यकर्ता म्हणून अखिल भारतीय प्रसिद्धि मिळाली. नंतर मी जीवननिष्ठा म्हणून हरिजनमुक्ति स्वतःपुरती चालूच ठेवली. विनोबांच्या कित्त्यानुसार अखंडपणे व अनन्यभावाने फिरत राहण्याचे ठरविले व ज्याजागी मुक्काम करित असे तेथे सफाईकाम शिविर भरवीत असे.

सफाई करणाराला कमीत कमी किळस वाटावा व घरच्या वापरणारांना पूर्ण स्वच्छ, स्वस्त, सुटसुटीत, कोठेहि मांडता व हलवता यावा असा 'कुटुंब कमोड" अप्पानी योजला. मुंबई राज्याच्या समाज कल्याण खात्याने 50% साह्य मान्य केले. अंबर चरखा शिकायला आलेले तरुणहि स्वच्छता कार्य करण्यास तयार झाले. एक खासा 'सवर्ण हरिजनवर्ग" किंवा 'नव-हरिजन संप्रदाय" तयार झाला. पण हिरमोड करणारेहि टपलेलेच असतात. अशांमुळे अनेक युवकांचा उत्साह कायमचा खच्ची होई. या तरुणांची लग्नें होण्याचीसुद्धा अडचण पडू लागली. शेवटी अप्पांनी हरिजनमुक्ति कार्याला दुय्यम स्थान देण्याचे ठरवून हरिजन मुक्तिकार्याचें संयोजक पद सोडून दिले.

हरिजनमुक्ति कार्याच्या दोन बाजू आहेत. पहिली व मुख्य बाजू - सफाईकर्मींचे किळसवाणे कामहि आपण जातीने करणे ः किळसवाणे असले तरीहि करणे असे नव्हे तर किळसवाणे आहे म्हणूनच परक्यावर न सोपविता आपले आपणच करणें ही मानवी प्रेरणा ः व दूसरी त्या कामाचा किळसवाणेपणा, शक्य तेवढ़ा कमी करण्यासाठी संडासाचे सोयीस्कर नमुने व सफाईची सोयीस्कर उपकरणे योजणें. या उपकरणांमध्ये सोपी कावड, मैला वाहण्याच्या हातगाड्या, ऊंच बूट, रबरी हातमोजे व विविध अवजारें येतात. अप्पांना अनुभव असा आला की हरिजनमुक्तिची ही दूसरी तांत्रिक बाजू सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटते, जुळते, झेपते, तिचाच बोलबाला होतो. आणि पहली किंवा मुख्य प्रेरणा सोयीस्कर प्रकारें नजरेआड केली जाते. 

वर्तमानात पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर भाजपचे सगळे छोटे-मोठे नेते सफाई कामास लागले आहेत यांत सेलेब्रिटिज देखील सामील आहेत. परंतु, सफाईच्या नावावर देखावा व फोटो सेशन चालले आहेत. 14 ते 19 नोव्हेंबर जी सफाई मोहिम चालली होती त्या विशेष स्वच्छते मोहिमेवरती स्वतः केंद्रसरकार नजर ठेवणार होती आणि राज्यांत चालणाऱ्या या विशेष मोहिमेची साक्ष्य देखील मागली जाणार होती. परंतु, परिणाम शून्यच निघाला व सगळीकडे घाण जशीच्या तशीच पसरलेली राहिली. 25 डिसेंबरला भारतरत्न अटलजी व पंडित मालवीयचींच्या जन्मदिवसावर योजलेल्या सफाई कार्यक्रमाचा परिणाम देखील तोच निघाला म्हणजे स्वच्छता आचरणात यावी व ती स्वतः करावी बेपत्ताच होती. 

वस्तुतः अशाप्रकाराचे कार्य जे सरळ समाजाशी संबंद्ध आहेत ते सरकार व राजनीतिक पक्षांच्या कुवतीच्या बाहेरचे असतात. अशी कार्ये तर अशा सामाजिक संस्थेंनी केली पाहिजेत ज्यांचा नेटवर्क (अखिल भारतीय) असून ज्यांच्या जवळ समर्पित कार्यकर्ते असतील तर यश मिळण्याची शक्यता जास्तीच जास्त राहिल. विनोबांच्या भूदान आंदोलनात कांग्रेस कोठेच नव्हती. हे कार्य विनोबांनी स्वतः आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच केले होते. आज जर कां वरील प्रकारच्या अराजकीय सामाजिक संघटनेंनी स्वच्छतेचे कार्य हाती घेतले तर यश नक्कीच मिळू शकते. गांधींच्या स्वप्नातील भारत साकारले जाऊ शकते. शेवटी एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की स्वच्छतेसाठी हवे भरपूर पाणी आणि हिंदुस्थानांततर पाण्याचे हाल काय आहेत ते सगळ्यां समोरच आहे. याचा देखील विचार आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment