महाराष्ट्रीय साधु - संतांचे राष्ट्रीय कार्य !
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना आढ़ळते की आमच्या देशातील साधु-संतांनी धर्मप्रचारा बरोबरच विविधरुपेण सामाजिक, साहित्यिक, राजकारणी व शिक्षणासंबंधी कार्य करुन देशाच्या उन्नतीस हातभार लावला आहे. बौद्धधर्माला सम्राट अशोकाचा राजाश्रय मिळाल्यामुळे त्यास अंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले. हिंदुचीन (इंडोचायना), हिंदुएशिया (इंडोनेशिया), बाली, बोर्नियोचे हिंदु आपला गोत्रपुरुष कौंडिण्य ऋषी सांगतात. अशामुळे भारतीय सभ्यतेचा प्रभाव दूरपर्यंत स्थापित झाला.
मध्ययुगात धार्मिक नेत्यांचा राज्यशासकांवर चांगलाच प्रभाव होता. देवगिरीच्या यादवांवर पंडित हेमाद्रि व बोपदेव, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक स्वामी विद्यारण्य व महाराष्ट्राचे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास आदी संत, बंगालात श्रीकृष्ण चैतन्य, आसामात शंकरदेव, आजच्या उत्तरप्रदेशात सुरदास, तुलसीदास, कबीर आदी, गुजराथात नरसीमेहता, स्वामीनारायण व बुंदेलखंडात स्वामी प्राणनाथ, पंजाबात गुरुनानकदेव, आदी साधुसंतांनी भारतीय सभ्यतेचे रक्षण, प्रचार व प्रभाव वाढ़विण्यास, स्थायी करण्याचे जे गौरवास्पद कार्य केले तो भारतीय इतिहासाचा एक विलक्षण अभिमानास्पद अध्याय आहे.
पण महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय व धार्मिक उन्नतीची एक बेमालूम सांगड बनली आहे. त्यामुळे राष्ट्रोद्धाराचे कार्य केवळ महाराष्ट्रातच उत्तमप्रकारे संपन्न झाले. महाराष्ट्रीय साधुसंतांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय, साहित्य व शिक्षणविषयी अद्भुतकार्य केले व निस्संदेह हे म्हटले जाऊ शकते की यांच कार्यांच्या आधारावरच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आपले हिंदवी स्वराज्य स्थापित करु शकले. राज्याकडून साधुसंत व गुणीजनांना आश्रय दिला जात असे. मुसलमानांच्या आक्रमणकाळापासून म्हणजे 12व्या शतकांपासून सतत मराठाशाहीच्या शेवटच्या काळापर्यंत महाराष्ट्रीय साधुसंतांनी देशाच्या संपूर्ण उन्नती करण्यात काही कसर सोडली नाही.
महाराष्ट्राचे शेवटचे हिंदुराजे देवगिरीचे यादवराजा साधु-संत व विद्वानांचे मोठे पोषक राहिले. तेव्हांच ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवरील आपली प्रसिद्ध 'ज्ञानेश्वरी" टीका लिहिली. बल्लाळराजांचे वेळी मुकुंदराज प्रसिद्धीस आला. त्याचवेळी त्याने आपला प्रसिद्ध ग्रंथ 'विवेकसिंधु" लिहिला. 12व्या शतकांत मराठींत जे जे ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांत ह्या मुकुंदराजाचे ग्रंथास अग्रस्थान दिले पाहिजे. पुढ़े मुसलमानांच्या स्वाऱ्यांना सुरुवात झाली व जसेच मुसलमान राज्यसत्तेचा आधार महाराष्ट्रात निर्माण झाला तसेच परक्या धर्मापासून जनतेला वाचविण्याकरिता महाराष्ट्रातल्या साधुसंतांनी पण एकेश्वरवाद, समताभाव आदींचा प्रचार करुन हिंदुधर्माच्या उज्जवलतेला कायम राखिले.
त्याकाळात महाराष्ट्रात भागवतधर्म तथा भक्तीमार्गाचा अधिक प्रचार झाला. या धार्मिक जागृतिच्या कार्यात सगळ्या जातींनी म्हणजे ब्राह्मण, मराठा, कुणबी, माळी, शिंपी, सोनार, कासार, कुंभार, आदी. स्त्री, दासींपासून मेहतरांनी सुद्धा हातभार लावला होता. त्यामुळे सर्वसाधारण जनतेवर भारतीय सभ्यतेचा स्थायी प्रभाव पडून परकी धर्माची मूळे दक्षिणेत जोर पकडू शकली नाहीत. याउलट शेखमहमंद सारखे कित्येक मुसलमान पण त्या धार्मिक चळवळीत हिंदुतत्त्वज्ञानाच्या रंगात रंगून गेले. ज्ञानेश्वरांच्या काळातच बौद्धधर्माचे परिवर्तित व संशोधित स्वरुप महानुभाव तथा जयकृष्णी पंथाचा प्रचार झाला व त्याने नंतर पंजाब आणि अतिदूर काबुल पर्यंत मठ स्थापित करुन आपल्या सिद्धांतांना पसरविले.
ज्ञानेश्वरांनी लोकांना स्पष्टपणे समझविले की ः देवाच्या दरबारात उच्चनीचचा भेद नसतो. नीचांच्या स्पर्शाने न तर गंगा अपवित्र होते व वायु देखील खराब होत नाही तसेच पृथ्वी पण अस्पृश्य होत नाही. त्यांच्या परंपरेचे महात्मा एकनाथ होते. जे आपल्या धार्मिक आचरणां व उदार विचारांमुळे आदर्श साधु म्हणविले गेले. एकदा त्यांनी श्राद्धाचे अन्न एका भंग्याला खावयास देऊन दिले यावर ब्राह्मण कोपले तेव्हां एक अपूर्व चमत्कार दाखवून त्यांनी सगळ्यांना संतुष्ट केले होते. आपल्या उदार विचारांनी व आदर्श आचरणानी एकनाथांनी समाजाला धर्माचे निश्चित स्वरुप दाखवून अस्पृश्याना देखील आत्मसात करुन कृतिमतेला दूर हाकलले.
तुकारामांनी पण मोठे उदार विचार प्रकट केले आहेत ः उंच नीच कांही, नेणे हा भगवंत। तिष्ठे भाव भक्त, देखोनिया।। अर्थात् देव उच्च-नीच बघत नाही, भक्ताच्या भावनांनाच बघतो. अशाप्रकारचा उपदेश करुन समता व भक्तीचा प्रचार केला. आज देखील महाराष्ट्रात वारकरी पंथात भेदभावावांचून सगळ्यांचा समावेश होतो. याप्रकारे परकी सत्तेचे आधिपत्य आणि त्यांच्या सभ्यतेस रोखण्या करिता परधर्मींवर पण प्रभाव स्थापिण्याकरिता या संतांनी स्वभाषा, स्वधर्म व स्वदेशाच्या उचित स्थितिचे विवेचन करुन लोकांच्या मनात स्वराज स्थापित करण्याची आशा संचारून छत्रपती शिवाजी महाराजांकरिता कार्यक्षेत्र तयार केले होते.
छत्रपतींच्या भावी कार्याचे महत्व मुक्तेश्वरांनी अशाप्रकारे दाखविले आहे - साधलिया स्वराज्य संपत्ति। यज्ञीं देव तृप्त होती।। श्राद्धीं पितृगण अतिथि। अन्नदानें तोषती। जैसे कंटक मर्दावे पायी। तेंवी दुर्जन दंडावे।।
याप्रकारे ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांच्या पूर्ववर्ती एकनाथ, तुकाराम सारख्या संतांनी अदमासे 300 वर्षांपर्यंत स्वधर्म व स्वाभिमानाच्या विचारांना प्रसृत करुन देशाची अद्भुत सेवा केली.
No comments:
Post a Comment